लोकसत्ता
Tuesday, September 10, 2024
Read Original Story At
https://epaper.loksatta.com/Pune-marathi-Late-epaper?eid=15&edate=10/09/2024&pgid=131566&device=desktop&view=2

विज्ञानातून विकासाकडे नेणारी नवी धोरणे
विज्ञानातून विकासाकडे नेणारी नवी धोरणे

विज्ञानातून विकासाकडे नेणारी नवी धोरणे

उटगीकर, रवींद्र | Utagikar, Ravindra


विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आघाडीवर भारताने गेल्या दशकात लक्षणीय प्रगती साधली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, खगोलविज्ञान, अक्षय ऊर्जा, सेमीकंडक्टर, हवामान संशोधन, अवकाश संशोधन, जैवतंत्रज्ञान आदी क्षेत्रांवर आपण विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मंगळयान, चांद्रयान-१, कोविड साथीच्या काळात कोविडची लस, डिजिटल स्टॅक किंवा ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या स्वदेशातील विकासासह विविध क्षेत्रांमध्ये भारताने केलेल्या प्रगतीचे जगभरात कौतुक झाले.

विज्ञान धारा

या योजनेअंतर्गत मूलभूत संशोधन, शाश्वत ऊर्जा, पाणी यांसारख्या अतिमहत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे क्षेत्र बळकट करून देशाच्या संशोधन व विकासाचा पाया विस्तारण्यासाठी मनुष्यबळ निर्मितीतदेखील योगदान मिळेल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अगदी शालेय पातळीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व स्तरांवर, नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अधिक प्राधान्य मिळणार आहे. विज्ञान धाराअंतर्गत संशोधन उपक्रम तसेच नावीन्यपूर्ण प्रकल्पांसाठी निधी आणि अनुदान प्रदान करण्यात येणार आहे. औद्याोगिक आणि शैक्षणिक संस्थांमधील संयुक्त संशोधन उपक्रम आणि सहयोगात्मक प्रकल्पांची अंमलबजावणी ही योजना करणार आहे. स्टार्ट-अप्स, उद्याोजक आणि नवसंशोधकांसाठी विशेष नवोन्मेष केंद्रे देशभर स्थापन केली जातील. या योजनेमुळे जागतिक संशोधन संस्थांशी ज्ञानाची देवाणघेवाण आणि संयुक्त प्रकल्पांद्वारे आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य सुलभ होणार आहे. तरुण संशोधकांची प्रतिभा विकसित करून क्षमता बांधणीच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शास्त्रज्ञांशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे.

बायो ई-३

हवामान बदलांच्या परिणामांची तीव्रता कमी करणे आणि अन्न सुरक्षा आणि मानवी आरोग्य यांसारख्या काही गंभीर सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी, जीवशास्त्राशी संबंधित उद्याोगांत गुंतवणूक करण्याची आज नितांत गरज आहे. जैव-आधारित कच्चा माल वापरून प्रगत जैवतंत्रज्ञान प्रक्रियांद्वारे जैव-उत्पादननिर्मिती होते. बायो ई-३ योजनेचे उद्दिष्ट इकॉनॉमी, एन्व्हायर्नमेंट व एम्प्लॉयमेंट अर्थात अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार या प्रमुख क्षेत्रांमध्ये समतोल राखून भारताला जागतिक जैवतंत्रज्ञान शक्तिस्थानात रूपांतरित करणे हे आहे. त्यासाठी मजबूत जैव उत्पादन परिसंस्था उभारून नवकल्पनांद्वारे जैव-आधारित उत्पादने विकसित करणे ही संकल्पना आहे. जैवउत्पादन क्षेत्रामध्ये संशोधन, विकास आणि उद्याोजकता यांना नवोन्मेष-आधारित पाठबळ समाविष्ट आहे. यामुळे जैव-उत्पादन संस्था, बायो-एआय हब आणि बायो-फाऊंड्री केंद्रे स्थापन करून तंत्रज्ञान विकास आणि व्यावसायीकरणाला गती मिळेल. हरित विकासाचा मार्ग सुकर करणाऱ्या पर्यावरणस्नेही जैव-अर्थव्यवस्थेस प्राधान्य देण्याची तजवीज असलेले हे धोरण ग्रामीण भारतातील कुशल मनुष्यबळाचा विस्तार सुलभ करेल. शेतकरी समुदायामध्ये रोजगारनिर्मिती आणि उद्याोजकतेस चालना मिळेल.


7P

Copyright with लोकसत्ता
News Uploaded By: GDTLSANGLI